बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील जलसाठ्याची आकडेवारी आता सावध करणारी ठरली आहे. मोठ्या प्रकल्पांत केवळ ४३.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, खडकपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त साठा थेट शून्यावर आहे. पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या गरजांसाठी आताच काटेकोर नियोजन करण्याची गरज या आकडेवारीने अधोरेखित केली आहे.
पाटबंधारे विभागाच्या बुधवारच्या सकाळी सातच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून २४४.८४० दशलक्ष घनमीटर, अर्थात ५२.६८ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. नळगंगात ७६.१८ टक्के आणि पेनटाकळीत ७३.३२ टक्के पाणी असले, तरी खडकपूर्णात केवळ ६२.८६४५ दशलक्ष घनमीटर मृतसाठा नोंदविण्यात आला आहे.
सात मध्यम प्रकल्पांत ७०.७३ टक्के साठा आहे. पलढग ९८, ज्ञानगंगा ९५.९९ आणि उतावळी ८७.८२ टक्क्यांवर असल्याने काहीसा दिलासा आहे. मात्र, तोरणात अवघे २९.५३ टक्के, तर मन प्रकल्पात ४१.८१ टक्के पाणी असल्याने सर्वत्र समाधानकारक स्थिती असल्याचे म्हणता येणार नाही.
जिल्ह्यातील ४२ लघु प्रकल्पांत ४८.८६ टक्के साठा आहे. बुलढाणा शहरासाठी महत्त्वाच्या येलगाव धरणातील ७७.४२ टक्के साठा दिलासादायक आहे.
आता प्रश्न धरणातील टक्केवारीचा नाही; उपलब्ध पाणी किती काळ पुरवायचे, याचा आहे!
पाण्याचा अपव्यय रोखणे, वितरणातील गळती थांबविणे आणि सिंचनाचे नियोजन स्पष्ट करणे आवश्यक आहे. काही धरणांतील भरघोस साठ्याचा दिलासा घेत बसताना कमी साठ्याच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष परवडणार नाही. प्रशासनाने प्रकल्पनिहाय आढावा घेऊन पाणीवापराचे नियोजन करावे; टंचाई दारात आल्यानंतरची धावपळ नागरिकांना परवडणारी नाही!





Total Users : 3665393