spot_img
spot_img

२१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या… हजारो भाविकांची पंगत! अंबिकादेवीच्या दरबारात भक्ती अन् सेवाभावाचा जागर!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) देवीच्या जयघोषात रंगलेला परिसर… महाआरतीसाठी जमलेले भाविक अन् महाप्रसादासाठी राबणारे शेकडो हात! शहरातील माळीखेल परिसरातील पुरातन, जागृत अंबिकादेवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी आयोजित भव्य महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

सायंकाळी सहा वाजता देवीच्या महाआरतीनंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ झाला. तब्बल २१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या, ३ क्विंटल डाळ आणि २ क्विंटल तांदळाचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. सोबत सलाद, लिंबू आणि काकडीचीही व्यवस्था होती. पंचक्रोशीतील महिला, पुरुष आणि आबालवृद्धांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

हजारो भाविकांची उपस्थिती असूनही नियोजनाचा ताळमेळ ढळला नाही. मंदिराचे विश्वस्त मंडळ, माळीखेलमधील भाविक, युवक, महिला व पुरुष सेवाधारी आणि शहरवासीयांनी जबाबदारी उचलत वितरणाची व्यवस्था सुरळीत ठेवली. सेवाधाऱ्यांच्या तत्परतेमुळे भाविकांना गैरसोयीविना महाप्रसाद घेता आला.

नवरात्रोत्सवानंतर झालेल्या या सोहळ्याने मंदिर परिसर पुन्हा भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने उत्सवाला व्यापक स्वरूप दिले. महाप्रसादाच्या तयारीपासून वितरणापर्यंत स्थानिकांचा सहभाग ठळकपणे दिसून आला. प्रत्येक भाविकापर्यंत प्रसाद पोहोचविण्यासाठी सेवाधारी कार्यरत होते. शिस्तबद्ध व्यवस्थेबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

अंबिकादेवीच्या दरबारातील हा सोहळा केवळ महाप्रसादापुरता मर्यादित राहिला नाही; सामूहिक श्रम, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून गेला! भाविकांची मोठी उपस्थिती आणि सेवाधाऱ्यांच्या योगदानामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!