बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिक्षकांच्या प्रश्नांवर राजकीय पक्षांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. शिक्षक मतदार परिवर्तन घडवतील आणि शिक्षक संघटनांनाच विजय मिळवून देतील, असा दावा शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांनी केला. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान सुरू असताना बुलढाण्यातील मतदान केंद्राबाहेर पाहणीदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
एकूण २६ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत देवकरांनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला. शिक्षकांनी पक्षांच्या उमेदवारांऐवजी शिक्षक संघटनांच्या पाठीशी उभे राहावे. राजकीय पक्षांना असा धडा शिकवावा की, भविष्यात या मतदारसंघात उमेदवार उभा करण्यापूर्वी त्यांना विचार करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. सत्तेत असलेले पक्षही हे प्रश्न सोडवण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप देवकरांनी केला. शिक्षक संघटना मात्र प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांना या मतदारसंघात पुन्हा उभे राहण्याची हिंमत होऊ नये, इतका स्पष्ट संदेश शिक्षकांनी मतदानातून द्यावा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनाच प्रामाणिकपणे लढत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.
पंजाबराव देशमुख आणि बी. टी. देशमुख यांचा वारसा सांगणारा अमरावती शिक्षक मतदारसंघ परिवर्तन घडवणारा आहे, असे देवकर म्हणाले. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या संघटनांना मतदार साथ देतील आणि या निवडणुकीत संघटनांचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






Total Users : 3650951