spot_img
spot_img

व्यवसाय वेगळा केला… अन् रात्री फाट्यावर रक्त सांडलं! पत्नी अन् चिमुकल्यासमोर पतीला हॉकी स्टिकने मारहाणीचा आरोप; बेराळा फाट्यावर नेमकं घडलं काय? भागीदारीतील ९ लाख ७० हजारांचा हिशोब मिळाला नसल्याची तक्रार; पतीला वाचविणाऱ्या महिलेलाही गैरवर्तनाचा सामना, तिघांविरुद्ध गुन्हा!

चिखली (हॅलो बुलढाणा) भागीदारी सोडून स्वतःचा रेती-गिट्टीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर धमक्या आणि पुढे पत्नी व चार वर्षांच्या मुलासमोर रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण! बेराळा फाटा येथे २ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या घटनेबाबत अश्विनी रामेश्वर चव्हाण यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, येवता येथील रामेश्वर चव्हाण यांनी नातेवाईकासोबत २०२० मध्ये भागीदारीत रेती–गिट्टीचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी २०२० मध्ये ४ लाख ७० हजार आणि २०२३ मध्ये ५ लाख रुपये दिले होते. मात्र, व्यवसायाचा हिशोब मिळाला नसल्याने ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ‘एकट्याने व्यवसाय करू नको, बंद कर; नाहीतर तुला सोडणार नाही’, अशा धमक्या फोनवरून मिळत असल्याचा आरोप आहे.

२ ऑक्टोबरला चव्हाण दाम्पत्य मुलासह वडाळा येथील नातेवाईकांना भेटून घरी परतत होते. चिखलीत आल्यानंतर रामेश्वर यांना फोनवर मेहकर फाट्यावर भेटण्यास सांगण्यात आले. मात्र, पत्नी आणि मुलगा सोबत असल्याने ते तेथे न थांबता बेराळा फाट्यावर दुसऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले.

रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास तिघांनी तेथे येऊन रामेश्वर यांना गाडीतून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लाकडी हॉकी स्टिकने डोक्यावर प्रहार केल्याने रक्तस्राव झाला; दत्तात्रय सोळंकी यांनी काठीने हात व खांद्यावर मारल्याचाही आरोप आहे. पतीला सोडविण्यास गेलेल्या अश्विनी यांचा उमेश पहाड यांनी वाईट उद्देशाने हात धरून जवळ ओढल्याची तक्रार आहे.

रामेश्वर बेशुद्ध पडल्यानंतर तिघे निघून गेल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. त्यानंतर गावातील दोघे घटनास्थळी आले. रामेश्वर यांच्यावर २ ते ३ ऑक्टोबरदरम्यान उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर ५ ऑक्टोबरला तक्रार देण्यात आली. पोलीस हवालदार विकास कैलास देशमुख यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!