spot_img
spot_img

DJ च्या दणदणाटाविरोधात युवकांचा ‘आवाज’! शाळा-दवाखाना परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ घोषित करा; नियम मोडणाऱ्या आयोजकांवर थेट कारवाईची मागणी!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड) गणेशोत्सवाच्या नावाखाली डोणगावच्या राज्य महामार्गावर घुमणाऱ्या DJ-डॉल्बीच्या कर्णकर्कश दणदणाटाविरोधात आता युवकांनीच पुढाकार घेतला आहे. उत्सव जरूर साजरा करा; मात्र रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याशी खेळू नका, अशी ठाम भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाप्रसाद केशवराव आखाडे आणि सुशील गवई यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात निवेदन दिले. ठाणेदार गणेश इंगोले यांच्याकडे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता थेट कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

डोणगावच्या राज्य महामार्गालगत प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालये, जिल्हा परिषद शाळा आणि विविध शैक्षणिक संस्था आहेत. गणेशोत्सवातील मिरवणुकांदरम्यान DJ-डॉल्बीचा आवाज मर्यादेपलीकडे गेल्यास रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो, तर वृद्ध, लहान मुले, प्रवासी आणि वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे PHC, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसराला तातडीने ‘संवेदनशील क्षेत्र’ घोषित करून DJ-डॉल्बीवर कडक निर्बंध लावावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

राज्य महामार्गावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असताना मिरवणुका आणि DJच्या गोंगाटामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोकाही वाढू शकतो. पोलीस प्रशासनाने उत्सवापूर्वीच ठोस वाहतूक नियोजन करावे आणि नियम मोडणाऱ्या DJ चालकांसह आयोजकांवरही तत्काळ कारवाई करावी, अशी भूमिका युवकांनी मांडली.

“उत्सवाला विरोध नाही; पण उत्सवाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात घालण्याचा अधिकार कुणालाही नाही!” असा स्पष्ट इशारा आखाडे आणि गवई यांनी दिला असून त्यांच्या मागणीला नागरिकांकडूनही जोरदार समर्थन मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!