spot_img
spot_img

अरुणाचलच्या सीमेवर पुत्राचा पहारा… पळसखेड चक्कात वडिलांची अंत्ययात्रा! सिंदखेड राजा तालुक्यातील मुंढे परिवारावर नियतीचा दुहेरी घाव; दोन दिवसांत दोन आधारवड हरपले! उद्या चुलते-पुतण्यांचा एकाच ठिकाणी, एकाच वेळी सावडण्याचा विधी

पळसखेड चक्का (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील मुंढे परिवारावर अवघ्या दोन दिवसांत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिवारातील ज्येष्ठ सदस्य स्व. कारभारी मुकुंदाराव मुंढे काका (वय ८३) आणि स्व. प्रल्हाद नारायण मुंढे (वय ७२) या चुलते-पुतण्यांचे लागोपाठ निधन झाले. आयुष्यभर काळ्या मातीत घाम गाळत कष्टाची भाकर कमावणारे दोन आधारवड काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

स्व. कारभारी मुकुंदाराव मुंढे यांचा अंत्यविधी ८ सप्टेंबरला, तर स्व. प्रल्हाद नारायण मुंढे यांचा अंत्यविधी ९ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. अवघ्या दोन दिवसांत झालेल्या या दुहेरी आघाताने दोन्ही परिवारांवर शोककळा पसरली आहे.

कारभारी मुंढे यांचे पुत्र नंदकिशोर मुंढे हे स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवतात. प्रल्हाद मुंढे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटीचे माजी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे पुत्र अनिल मुंढे हे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सक्रिय आहेत.

या दुःखाला आणखी वेदनादायी किनार आहे. प्रल्हाद मुंढे यांचे पुत्र नरेंद्र मुंढे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत असून सध्या अरुणाचल प्रदेशात देशसेवा बजावत आहेत. मातृभूमीच्या रक्षणाचे कर्तव्य आणि हजारो किलोमीटरचे अंतर यामुळे त्यांना वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. देशासाठी पहारा देणाऱ्या पुत्राला वडिलांचा अखेरचा निरोपही घेता न आल्याची सल मन हेलावून टाकणारी आहे.

दोन्ही दिवंगत चुलते-पुतण्यांचा सावडण्याचा विधी उद्या १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पळसखेड चक्का येथे एकाच ठिकाणी व एकाच वेळी होणार आहे.

दोन्ही दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!