spot_img
spot_img

सात डॉक्टर, दोन सीए अन् २५० गुणवंतांचा गौरव! जळगाव जामोदमध्ये माळी समाजाचा ‘प्रतिभेला सलाम’; यशस्वी भविष्यासाठी विद्यार्थ्यांना नवी दिशा!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) गुणांना प्रोत्साहन आणि प्रज्ञेला प्रतिष्ठा देत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका माळी समाज महात्मा फुले मंडळाने समाजासमोर प्रेरणेचा नवा आदर्श उभा केला. रविवारी, २३ ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्रातील उमादेवी सभागृहात आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात सात डॉक्टर, दोन चार्टर्ड अकाउंटंटसह तब्बल २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन दिमाखदार गौरव करण्यात आला.

माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.

अकोल्यातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. निलेश वानखडे व डॉ. नेहा वानखडे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘समाजभूषण’ पुरस्काराने सपत्नीक सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या दाम्पत्याच्या कार्याला सलाम केला.

प्रमुख मार्गदर्शक ललित काळपांडे यांनी दहावी-बारावीनंतरच्या शैक्षणिक संधींची दारे विद्यार्थ्यांसमोर खुली केली. केवळ पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीत अडकून न राहता तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले.

“गुणवंतांचा सत्कार म्हणजे केवळ प्रमाणपत्र देणे नव्हे, तर पुढील पिढीच्या स्वप्नांना बळ देणे आहे,” असे ठाम प्रतिपादन डॉ. स्वाती वाकेकर यांनी प्रास्ताविकातून केले.

कार्यक्रमाला अरुण तीखे, उर्मिलाताई इंगळे, प्रा. भाऊसाहेब इंगळे, ॲड. ज्योती ढोकणे, प्रकाश ढोकणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुपडा इंगळे व दीपाली इंगळे यांनी केले, तर ज्ञानदेव राजनकर यांनी आभार मानले. महात्मा फुले मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या यशासाठी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!