बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शालेय पोषण आहारासाठी FSSAI परवाना घेणे बंधनकारक करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासकीय, निमशासकीय व अनुदानित विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी शासनाकडूनच कच्चा अन्नधान्य पुरवठा केला जातो. शाळा व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापक या अन्नधान्याचे खरेदीदार नसून शासनाकडून उपलब्ध करून दिलेले अन्न केवळ शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम करतात. त्यामुळे अशा शाळांना FSSAI नोंदणी व परवाना घेण्याची सक्ती करणे अन्यायकारक आणि अनाकलनीय आहे, अशी स्पष्ट भूमिका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नामदेव जाधव यांनी मांडली आहे. जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सभेत बोलताना नामदेव जाधव यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, शाळा व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापक हे पोषण आहाराच्या अन्नधान्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खरेदीदार नाहीत. अन्नधान्याची खरेदी, पुरवठा आणि त्यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया शासन स्तरावर होत असेल, तर शाळेच्या पातळीवर केवळ शासनाकडून प्राप्त झालेले अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. अशा परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापकांना अन्न व्यवसाय करणाऱ्या संस्थांप्रमाणे FSSAI नोंदणी आणि परवाना काढण्याची सक्ती करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“ज्यांनी अन्न खरेदी केलेच नाही, जे अन्नाचे विक्रेते नाहीत आणि ज्यांचा अन्नधान्याच्या खरेदी प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही, त्यांनाच FSSAI परवान्याच्या कक्षेत आणणे हा शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर अनावश्यक प्रशासकीय बोजा आहे,” असे नामदेव जाधव यांनी स्पष्ट केले.
शाळांमध्ये आधीच अध्यापन, विद्यार्थी नोंदी, विविध शासकीय योजना, ऑनलाइन माहिती भरणे, प्रशासकीय कामकाज आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात आणखी नोंदणी, परवाने आणि कागदोपत्री प्रक्रियेची भर टाकल्यास शिक्षकांचे लक्ष विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विचलित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा गांभीर्याने पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या विषयावर केवळ सभेत चर्चा करून थांबणार नसून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचेही नामदेव जाधव यांनी सांगितले.












Total Users : 3329593