नांदुरा (हॅलो बुलढाणा) बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचा संशय असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींचा डाव एका महिलेच्या सतर्कतेमुळे उधळल्याची घटना नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुटी येथे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. महिलेला धक्का देत चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरून पळालेल्या दोघांना तरुणांनी आणि ग्रामस्थांनी थरारक पाठलाग करून पकडले.
फिर्यादी सुलोचना संजय सातव या आपल्या सासूच्या घरी जेवण घेऊन जात असताना त्यांना दीर विनायक सातव यांच्या घरासमोर एक अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी दिसली. “येथे काय करत आहात?” अशी विचारणा केली असता, “त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी आलो आहे,” असे सांगून तो दुचाकीवर बसून काही अंतर पुढे गेला.
त्याचवेळी बंद असलेल्या घरातून दुसरा अनोळखी व्यक्ती अचानक बाहेर आला. “तू चोर आहेस का?” असा सवाल करत सुलोचना यांनी आरडाओरड केली. तेव्हा संबंधित व्यक्तीने कथितरीत्या चाकू काढून त्यांना धक्का दिला आणि बाहेर थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पलायन केले. त्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले.
आरडाओरड ऐकून जमा झालेल्या ग्रामस्थांनी दोघांचा पाठलाग सुरू केला. फिर्यादीचा मुलगा ऋतिक सातव, हर्षल भातुरकर, प्रतीक सातव, आनंद तायडे तसेच हिंगणा आणि मामुलवाडीतील ग्रामस्थांनी दोघांना पकडले. त्यानंतर डायल ११२ वर माहिती देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी अजय सुकलाल धर्मा आणि संजय नामदेव चिंचोळकर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा क्रमांक ५३९/२०२६ दाखल केला आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.












Total Users : 3330594