बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकऱ्यांचे हक्क, सहकारातील पारदर्शकता आणि बँकेचा सर्वांगीण विकास हा अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ सात जागांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. पॅनलचे निवडणूक चिन्ह ‘ट्रॅक्टर’ आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मतदारांना केलेल्या जाहीर आवाहनातून विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक अवसायनात गेल्यानंतर तिला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अजितदादांनी बँकेला तब्बल ३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करून नवसंजीवनी दिल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, बँकेला संकटातून बाहेर काढणाऱ्या अजितदादांच्या पक्षालाच निवडणुकीत बाजूला ठेवून इतर पक्षांना सोबत घेण्यात आले. तसेच २१ पैकी १२ संचालक बिनविरोध करण्यात आल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वतंत्र परिवर्तन पॅनल उभे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पॅनलकडून मनोज ज्ञानदेव दांडगे, ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील, उज्वला गणेश मोरे, शिवनंदा रामकिसन खंड, शिवचंद्र तेजराव तायडे, मंदाकिनी रमेशराव चांभारे पाटील आणि प्रतिभा विनायक टाने हे उमेदवार रिंगणात आहेत.
उदा रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान होणार आहे. “ट्रॅक्टर निशाणीवर शिक्का मारून सातही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.












Total Users : 3326952