मेहकर (हॅलो बुलढाणा) येथील जगातील ६ वे प्रसिद्ध नरसिंह मंदिरात श्रावणमासाच्या निमित्ताने विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्राचे रात्रंदिवस अखंड पाठ होणार आहेत. १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत श्री नरसिंह संस्थानच्या वतीने हे पाठ आयोजित करण्यात आले आहेत.
जगातील अकरापैकी सहावे अशी ओळख असलेल्या मेहकरच्या प्राचीन नरसिंह मंदिरात विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यातल्या पहिल्या शनिवारपासून दुसऱ्या शनिवारपर्यंत या मंदिरात दिवसभर महिला भाविक आणि रात्रभर पुरुष भाविक या स्तोत्राचे अखंड पाठ करतात.एक मिनिटाचाही खंड पडू न देता आठवडाभर रात्रंदिवस या स्तोत्राचे पाठ करणे, हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम असून तो इतरत्र कुठेही होतांना दिसत नाही. नरसिंह संस्थानचे अध्यक्ष सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या प्रेरणेने दरवर्षी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे. गेल्यावर्षी यामध्ये २५० भाविकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. यावर्षी यापेक्षा अधिक भाविकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा,असे आवाहन श्री नरसिंह संस्थानने केले आहे.
▪️अकरा हजार पाठांचे लक्ष्य!
विशेष म्हणजे गेल्यावर्षी या उपक्रमात साडेदहा हजार पाठ झाले होते.मात्र अकरा हजार पाठांचा टप्पा गाठल्या गेला नव्हता. यावर्षी तो टप्पा गाठण्याचे लक्ष्य सद्गुरु पितळे महाराजांनी आमच्यापुढे ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु असे श्री नरसिंह संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर यांनी आमच्या प्रतिनिशी बोलतांना सांगितले.










Total Users : 3288519