spot_img
spot_img

BREAKING खळबळजनक! ‘राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकीन’… अखेर करमोड्याच्या लोकनियुक्त सरपंचाने उचलले टोकाचे पाऊल! मृत्यूपूर्वीचा ‘तो’ व्हिडिओ पाहून गाव हादरले; खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. संजय कुटेंचे नाव घेत नेमकी कोणती विनंती केली?

संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आज ११ ऑगस्ट रोजी सकाळी समोर आलेल्या धक्कादायक घटनेने राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक प्रकाश उगले यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला. सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी राजकीय विरोधकांकडून दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, उगले यांनी रात्रीच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका लोकनियुक्त सरपंचाचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्यामुळे करमोड्यासह संग्रामपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ ठरणार महत्त्वाचा पुरावा?

दीपक उगले यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेल्या व्हिडिओमध्ये एका राजकीय विरोधकावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. “राजीनामा दे, अन्यथा संपवून टाकीन,” अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि आपला अंत्यविधी शांततेत पार पडावा, असे आवाहनही त्यांनी व्हिडिओत केले आहे.

उगले यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव घेत प्रकरणात पुढाकार घेण्याची विनंती केली. संबंधित आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी व्हिडिओतून केल्याचे समोर आले आहे. मात्र, व्हिडिओतील आरोपांची स्वतंत्र आणि अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून त्यांची सत्यता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

सरपंचपदासाठी दबाव की राजकीय वैमनस्य?

दीपक उगले हे करमोड्याचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे सरपंचपदावरून निर्माण झालेला संघर्ष, राजकीय वैमनस्य किंवा अन्य काही कारण आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ, मोबाइलमधील संभाषणे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची कसून चौकशी होणे आवश्यक आहे.

घटनेनंतर तामगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरवट बकाल येथे पाठविण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!