धाड (हॅलो बुलढाणा) पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवत परिसरात कथित दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर अखेर हद्दपारीचा बडगा उगारण्यात आला आहे. दत्तात्रय ऊर्फ उमेश दीपक चिंचोले (वय २८, टोळीप्रमुख) आणि प्रभाकर दामोदर वैद्य (वय २८, दोघे रा. धाड) यांना ९ ऑगस्ट २०२६ पासून दोन वर्षांसाठी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
धाड पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५(१) अंतर्गत तयार केलेला प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. संबंधितांना बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर त्यांच्यावरील दाखल गुन्हे, पूर्वीच्या कारवाया आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवरील परिणामांचा विचार करून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हद्दपारीचा आदेश दिला.
पोलिसांच्या माहितीनुसार, वारंवार कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात बदल झाला नव्हता. परिसरातील कथित दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठीही पुढे येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे व पथकाने ही कारवाई केली. कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर हद्दपारीसह एमपीडीएची कठोर कारवाई करण्याचा इशाराही धाड पोलिसांनी दिला आहे.










Total Users : 3271630