बुलढाणा/चिखली (हॅलो बुलढाणा) शहीद पॅराकमांडो हरिदास मधुकर कापसे यांचे पार्थिव थोड्यावेळापूर्वी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचले. पार्थिव छत्रपती संभाजी नगर छावणीकडे रवाना होणार असून तिथे लष्करी इतमामात सलामी दिली जाणार तर
उद्या सोमवारी पार्थिव चिखलीकडे सकाळी १० वाजता निघणार असून, त्यांच्या निवासस्थाना वरून अंत्ययात्रा, तर सकाळी ११ वाजता तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
हवालदार हरिदास कापसे हे मूळ चिखली तालुक्यातील शेलसुर येथील आहेत. उत्तराखंड येथे अति उंचावरील (हाय अल्टीट्यूड) भागात पोस्टींग असतांना प्राणवायू कमी पडल्याने हृदयविकाराच्या झालेल्या त्रासामुळे भारतीय सैन्यातील मूळ बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप युनिटचे व सध्याचे ४११ (स्वतंत्र) पॅरा फिल्ड कंपनी आग्रा येथे सेवेत असणारे हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. त्यांचा वाढदिवस स्वातंत्र्य दिन म्हणजेच येणाऱ्या १५ ऑगस्टला आहे.परंतु त्यांचे पार्थिवच ९ ऑगस्ट क्रांती दिनाला छत्रपती संभाजी नगर येथे पोहोचले. उद्या त्यांच्यावर चिखलीत लष्करी ईतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. हरिदास कापसे हवालदार म्हणून पॅरा फिल्ड कंपनीत कर्तव्यावर होते. ७ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांची नियुक्ती लापथल पोस्ट येथील हार्डन्ड भूमिगत बंकरच्या बांधकामाच्या कामावर होती. कर्तव्यावर असतांना सायंकाळी ५ वाजता त्यांना उलटी झाली, त्यानंतर ते चालत ५ वाजून ३५ मिनीटांनी मेडीकल इन्स्पेक्शन रुममध्ये आले. तेथे त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येवून औषधोपचार देण्यात आले आणि पुढील १ तास म्हणजे ६.३५ वाजेपर्यंत त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यांच्या जीवनावश्यक बाबी तपासल्या असता त्या सामान्य आढळल्या. त्यामुळे त्यांना मेडीकल इन्स्पेक्शन रुममधून डिस्चार्ज देण्यात आला. हवालदार हरिदास कापसे हे नंतर सायंकाळी ७. ३५ वाजता पुन्हा ड्युटीवर जात असतांना त्यांना चक्कर आली. ते कोसळले व बेशुध्द झाले. तात्काळ त्यांना ७.३७ वाजता पुन्हा मेडीकल इन्स्पेक्शन रुममध्ये आणण्यात आले, त्यावेळी ते धापा टाकत होते. आरएमओ यांनी तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करुन त्यांना वाचविण्यासाठी आपातकालीन पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले. त्यांना सीपीआर, हाय फ्लो ऑक्सीजन तसेच आपत्कालीन इंजेक्शन देण्यात आले, मात्र त्यानंतरही त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली व ७ ऑगस्ट रोजी रात्री ८.२६ वाजता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थीव जोशीमठ येथे पहाटे ३.३० वाजता आणण्यात आले.
या घटनेची माहिती ८ ऑगस्टला सकाळी कळाली, त्यावेळी शेलसूर व चिखली परिसरावर एकच शोककळा पसरली.शहीद हवालदार हरिदास मधुकर कापसे यांच्या मातोश्रीचे ३ महिन्यापुर्वीच निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी वृषाली, मुलगा ऋग्वेद की जो सहकार विद्या मंदिर बुलढाणा शिकतो व दोनच दिवसापूर्वी वाढदिवस झालेली तीन वर्षीय मुलगी वैदेही व २ भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. मुलगी वैदेहीचा वाढदिवस ७ ऑगस्टला, हरिदासने मुलीसाठी ऑनलाईन गिफ्ट पाठवून सकाळी मोबाईलवर शुभेच्छा दिल्या व स्टेटसही ठेवले, सायंकाळी केक कापण्याच्या वेळी कुटुंबीयांनी त्यांना व्हिडिओ कॉलही करण्यात आला परंतु तो रिसिव्ह झाला नाही.. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर तिकडे उपचार सुरू होते, मुलीच्या वाढदिवसाची एका सैनिक वडिलांची मृत्यूची झुंज सुरू होती आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालावली आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले.शहीद पॅराकमांडो हरिदास कापसे यांना ‘हॅलो बुलढाणा’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!










Total Users : 3263510