मेहकर (हॅलो बुलढाणा) पाय धुण्यासाठी पाण्याने तुडुंब भरलेल्या खदानीत उतरलेल्या दोन मावस भावंडांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची हृदयद्रावक घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळीनजीक असलेल्या कोराडी प्रकल्प क्षेत्रात ८ ऑगस्टच्या सायंकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत राबविलेल्या शोधमोहिमेत आयान राजू शेख (वय १०, रा. देऊळगाव माळी) याचा मृतदेह सापडला; तर आवेद इब्राहिम शेख (वय ११, रा. लोणार) याचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि आवेद हे दोघे मावसभाऊ शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी प्रकल्प परिसरात आले होते. पाय धुण्यासाठी दोघेही जवळील खदानीत उतरले. मात्र, खदान तब्बल १५० ते २०० फूट खोल असून संततधार पावसामुळे ती पाण्याने पूर्ण भरली आहे. खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही चिमुकले पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता शोधमोहीम सुरू केली. मेहकर व देऊळगाव माळी येथील धाडसी तरुणांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री ११ वाजून १० मिनिटांनी आयानचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले.
आवेदचा शोध घेण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि स्थानिक तरुणांकडून रात्रीही मोहीम सुरू होती. पाण्याने भरलेल्या या जीवघेण्या खदानीभोवती सुरक्षा कठडे, धोक्याचे फलक अथवा प्रवेश रोखणारी व्यवस्था होती का, असा संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहे. एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? या दुर्घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.










Total Users : 3257573