जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) रेल्वेत कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आसलगाव येथील उच्चशिक्षित तरुणाची तब्बल ₹६ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी कल्याण येथील ब्रिजमोहन शंकरलाल सराटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आसलगाव येथील आशीष प्रल्हाद जाधव (वय ३८) यांनी एम.ई. मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले आहे. फिर्यादीनुसार, ओळखीच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या सराटे याने रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी लावण्यासाठी ₹९ लाखांची मागणी केली. विश्वास बसल्याने जाधव यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान एनईएफटी आणि पेटीएमद्वारे एकूण ₹६ लाख ४९ हजार ९९९ पाठविले.
यानंतर भुसावळ, पुणे, मुंबई, नागपूर आणि दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नावाने एकामागून एक कथित बनावट जॉईनिंग लेटर पाठविण्यात आले. धक्कादायक म्हणजे, विश्वास कायम ठेवण्यासाठी आरोपीने दोन वेळा ₹४१ हजार ५०० ‘पगार’ म्हणूनही पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे! मात्र प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही.
पोलीस अधीक्षकांच्या परवानगीनंतर जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.










Total Users : 3247541