spot_img
spot_img

EXCLUSIVE! एक रडण्याचा आवाज… मग दुसरा, तिसरा अन् चौथा! जळगाव जामोदच्या चारबनमधील घरात घडला दुर्मिळ चमत्कार; महिलेने एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म! डॉक्टरही चकित, गावकरीही अवाक्!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील आदिवासीबहुल चारबन गावात बुधवारी अशी घटना घडली की, संपूर्ण गाव अक्षरशः थक्क झाले. घरात प्रसूती सुरू झाली आणि काही वेळात एक नव्हे, दोन नव्हे तर एकामागून एक तब्बल चार नवजात बाळांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. रियानी पंशिराम सस्त्या या २७ वर्षीय महिलेने घरच्या घरी तीन मुलगे आणि एका मुलीला जन्म दिला.

कोणतीही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नाही, डॉक्टरांची टीम नाही आणि रुग्णालयातील प्रसूती कक्षही नाही; अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही दुर्मिळ प्रसूती पार पडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केली असता माता आणि चारही बालकांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले. मात्र, चारही बालकांचा जन्म मुदतीपूर्व झाल्यामुळे त्यांचे वजन केवळ ९०० ग्रॅम ते एक किलोदरम्यान असल्याचे सांगण्यात आले. कमी वजन आणि अतिदक्ष उपचारांची आवश्यकता लक्षात घेता चारही बाळांना पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

सध्या माता आणि चारही नवजात बालके तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. रियानी यांना यापूर्वी दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. आता तीन मुलगे आणि एका मुलीच्या जन्माने त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या सात झाली आहे.

मर्यादित सुविधा, घरातील प्रसूती आणि एकाचवेळी चार बाळांचा जन्म—या सर्व घटनाक्रमामुळे चारबन गावासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ही प्रसूती चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!