जानेफळ (हॅलो बुलढाणा/दिपक बनसोडे) मेहकर आगाराची एक बस विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत असताना अचानक बसची डिझेल टाकीच रस्त्यावर गळून पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत कुठलाही अनर्थ घडला नसला तरी, राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
“प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळ उत्तम सेवेचा गाजावाजा करीत असते परंतु मेहकर आगाराच्या भंगार बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात दिसून येत आहे. एसटीमध्ये तांत्रिक बिघाड, स्टेअरिंग रॉड तुटणे, टायमिंग व ब्रेक फेल होणे यांमुळे होणारे अपघात, तसेच चालत्या बसमधून धूर निघणे किंवा अचानक आग लागण्याच्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र मेहकर आगाराच्या बसची डिझेल टाकीच रस्त्यावर गळून पडल्याचा प्रकार पहिल्यांदा समोर आला आहे.आगारातून बस जेव्हा चालकांच्या हवाली केली जाते,त्यापूर्वी सदर बस सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बस बॉडी मेकॅनिक अर्थात वाहन बांधणी दुरुस्ती कारागीराकडून तांत्रिकदृष्ट्या चेक करण्यात येत असते. आमच्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, मेहकर आगारात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक व
बस बॉडी मेकॅनिक हे कर्तव्यावर दिसून आले नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले असून, मेहकर आगाराने भंगार व खिळखिळ्या बसेस रस्त्यावर सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.










Total Users : 3231434