बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लग्नात तब्बल ५० लाख रुपये खर्च, पतीला दोन लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि विविध चैनीच्या वस्तू देऊनही विवाहितेचा सोने व पैशांसाठी छळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. “पुन्हा पुण्यात दिसली तर मर्डर करून टाकू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप संबंधित विवाहितेने केला असून, तिच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय विवाहिता पुण्यातील आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तिचा विवाह मे २०२२ मध्ये पुण्यातील तरुणासोबत चिखली येथे मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सासरच्यांनी चांगली वागणूक दिली; मात्र त्यानंतर पती आणि सासूकडून सतत टोमणे, अपमान आणि पैशांची मागणी सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
“आम्हाला ५० तोळे सोने देणारे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न करून देणारे स्थळ आले होते; तुझ्याशी लग्न करून पस्तावलो,” असे म्हणत मानसिक त्रास दिल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. फोटोग्राफरचे दोन लाख रुपये, घरातील फर्निचरसाठी पैसे तसेच माहेराहून २५ ते ५० तोळे सोने आणण्याची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
पतीसाठी स्वतःच्या नावावर सात लाख रुपयांचे कर्ज काढून दिल्यानंतरही छळ थांबला नाही, असा दावा विवाहितेने केला आहे. तीन महिन्यांची गरोदर असताना तिला घराबाहेर काढण्यात आले. मुलगा तीन महिन्यांचा झाल्यानंतरही सासरचे कोणी त्याला पाहण्यासाठी आले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जुलै महिन्यात मुलाला घेऊन पुण्यातील सासरी गेल्यानंतर सासूने मारहाण करून घराबाहेर काढले, तसेच तिच्या आई व भावालाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.










Total Users : 3221274