जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील झाडेगाव येथे पहाटेच्या वेळी एका घरासमोर संशयास्पद पूजासाहित्य आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शेतकरी लालशहा युनुस शहा यांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात शेजाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, १५ जुलै रोजी पहाटे सुमारे ५ वाजता लालशहा बैलांना कुटार टाकण्यासाठी उठले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून ते हादरले. घराच्या उंबरठ्यासमोर विळ्याचे पान ठेवलेले होते. त्यावर कुंकू, हळद, गुलाल, बिब्बा आणि इतर साहित्य होते. त्यामध्ये तब्बल सात ते आठ लोखंडी सुयादेखील ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याच साहित्याजवळ शेजारी महादेव लक्ष्मण पांडे बसलेला दिसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. लालशहा यांना पाहताच तो घरात निघून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्याने आरोप फेटाळून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा दावा करण्यात आला.
कुटुंबावर जादूटोणा करण्याच्या उद्देशाने हे साहित्य ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास पोलीस हवालदार अतुल मोहोळे यांच्याकडे सोपविला आहे.










Total Users : 3221275