spot_img
spot_img

पाण्याच्या एका थेंबात दडला ‘डेंग्यूचा धोका’… घाटबोरीत आरोग्य विभागाचे घराघरांत ‘ऑपरेशन कंटेनर’!

घाटबोरी/मेहकर (हॅलो बुलढाणा/संतोष अवसरमोल)पावसाळ्यात डेंग्यू आणि साथीच्या आजारांचा धोका वाढताच मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आरोग्य विभागाने थेट ‘ऑपरेशन डेंग्यू’ सुरू केले आहे. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घाटबोरी आयुर्वेदिक उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती गवई यांच्या नेतृत्वात आरोग्य पथकाने गावातील प्रत्येक घर, वस्ती आणि परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

या धडक कंटेनर सर्वेक्षणात पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुलर, मडकी, टायर, नारळाच्या करवंट्या आणि पाणी साचणाऱ्या वस्तूंची कसून तपासणी करण्यात आली. डासांच्या अळ्या किंवा उत्पत्तीची शक्यता आढळताच संबंधित ठिकाणी तातडीने अळीनाशक द्रावण टाकून डासांचे केंद्र जागेवरच नष्ट करण्यात आले.

नागरिकांनी आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ धुवावीत, घराभोवती पाणी साचू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या किंवा डोळ्यांच्या मागे वेदना जाणवल्यास स्वऔषधोपचार न करता तातडीने आरोग्य केंद्रात तपासणी करण्याचे डॉ. गवई यांनी सांगितले.

या मोहिमेत आरोग्य सेवक एस. बी. ढोके, एस. आर. डाखोरे, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!