जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा /ज्ञानदेव राजनकर) तालुक्यात सायबर भामट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, फेसबुकवरील क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडलेल्या 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ₹10 लाख 71 हजार 453 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सावरगाव येथील राजेशकुमार भीकमचंद केला यांनी 26 जानेवारी 2026 रोजी फेसबुकवर USDT क्रिप्टोकरन्सीमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याची जाहिरात पाहिली. लिंकवर क्लिक करताच +44 क्रमांकावरून संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘सुनील कुमार’ असल्याचे सांगितले. मोठा नफा आणि नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे खोटे आश्वासन देत त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला.
या भूलथापांना बळी पडून फिर्यादींनी 27 जानेवारी ते 2 मार्चदरम्यान विविध व्यवहारांतून ₹10,71,453.20 आरोपीच्या सांगण्यानुसार हस्तांतरित केले. मात्र नफा तर दूरच, मूळ रक्कमही परत मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C), 66(D) तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष म्हणजे सायबर भामट्यांचा सापळा! अनोळखी लिंक, विदेशी क्रमांक आणि अवास्तव परताव्याच्या जाहिरातींपासून सावध राहा. फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधा.











Total Users : 3218206