बुलढाणा (हॅलो बुलढाणा) असे फार कमी लोक असतील ज्यांना गाणी ऐकायला आवडत नाहीत. तसे तर प्रत्येकाने गाणी ऐकायला हवीत. गीत- संगीत ऐकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते आणि मूडही पूर्णपणे फ्रेश होतो. मैत्रीदिनी बुलढाणेकर रसिकांचा असाच मूड फ्रेश केला तो कडक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या खाकी वर्दीच्या आड दडलेल्या एका कलावंताने! एसपी निलेश तांबे यांनी ‘जिना इसी का नाम है!’ हे गीत गाऊन उपस्थितांना जिंकले.
मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास नात्यांपैकी एक आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा वेगळे असले तरी मैत्रीचे नाते मनाने जोडलेले असते. सुखाच्या क्षणी आनंद साजरा करणारे आणि दुःखाच्या काळात खंबीरपणे साथ देणारे मित्र-मैत्रिणी आयुष्याला खास बनवतात. अशाच या सुंदर नात्याचा उत्सव म्हणजे फ्रेंडशिप डे! याच अनुषंगाने 2 ऑगस्टला बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत ‘जीना इसी का नाम है!’ हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शिवाय खाकी वर्दी ही केवळ एक वस्त्र नसून ते कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि समाजाच्या रक्षणाचे प्रतीक तर आहेच पण काही व्यक्तिमत्त्वांच्या मागे एक हळवा माणूस, एक कलावंत दडलेला असतो हे सुद्धा दाखवून दिले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्या
पासून एसपी निलेश तांबे यांनी अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार कारवाई केली. गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळून कायद्याचा धाक निर्माण करत त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम केली आहे. मात्र, या कडक अधिकाऱ्याच्या वर्दीच्या आड दडलेला एक कलावंत मैत्री दिनाच्या कार्यक्रमात दिसून आलाय. कार्यक्रमाच्या दरम्यान, उपस्थितांच्या आग्रहास्तव त्यांनी गायलेलं हे गीत उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं. त्यांचा आवाज, गायकीची जाण आणि भावना व्यक्त करण्याची शैली यामुळे वातावरण भारावून गेले होते. हा हृदयस्पर्शी क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, बुलढाणेकरांसाठी हा एक अनोखा अनुभव ठरत आहे.











Total Users : 3218364