spot_img
spot_img

Exclusive ‘हे आमचं काम नाही’ म्हणत सर्वांनी झटकले हात… पण वर्दीतल्या ‘साहेबांनी’ गर्दीतल्या लोकांसाठी जे केलं, त्याची डोणगावभर चर्चा!

डोणगाव (हॅलो बुलढाणा /अनिल राठोड) मुंबई–नागपूर महामार्गावरील डोणगाव बसस्थानकाजवळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असताना संबंधित यंत्रणा मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसली होती. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, पाणी साचले आणि दररोज वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला. दुचाकीस्वार घसरून पडत होते, पादचाऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागत होती; मात्र रस्त्याची जबाबदारी असलेल्या विभागाला नागरिकांच्या त्रासाचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे चित्र होते.

अखेर नागरिकांच्या वेदनेची दखल वर्दीतल्या अधिकाऱ्याने घेतली. डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले यांनी “हे आमच्या विभागाचे काम नाही” असे हात झटकण्याऐवजी तातडीने पुढाकार घेत धोकादायक खड्डे खडी आणि मुरूम टाकून बुजवून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे बसस्थानक परिसरातील अपघातांचा धोका कमी झाला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खड्डे बुजविणे हे खरे तर संबंधित रस्ते विभागाचे कर्तव्य; मात्र सरकारी यंत्रणा कागदी घोडे नाचवत असताना ठाणेदार इंगोले यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कृती केली. त्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
आता या पुढे खड्डा बुजविण्यासाठी पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागणार का? संबंधित विभाग कायमस्वरूपी डांबरीकरण करणार की पुन्हा एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच जागा होणार?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!