मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात आहेत की माजी आमदार संजय रायमुलकर? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण ठरले आहे संजय ऊर्फ संजूभाऊ रायमुलकर यांच्या फेसबुक पेजवरील परिचयातील ‘आमदार’ हा उल्लेख!
आज, ३ ऑगस्ट रोजी संजूभाऊ रायमुलकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यावर कार्यकर्ते आणि समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच काही जागरूक नागरिकांचे लक्ष त्यांच्या फेसबुक पेजच्या बायोकडे गेले. त्यामध्ये अद्यापही “आमदार, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघ” असा उल्लेख असल्याने मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मंत्रालयीन सेवेतून राजकारणात उतरलेल्या सिद्धार्थ खरात यांनी तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव करत मेहकरचा राजकीय इतिहास बदलला. त्यानंतर स्थानिक राजकारणातही शिवसेना शिंदे गटाला धक्के बसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार खरात यांनी अल्पावधीतच अभ्यासपूर्ण कार्यशैली, मतदारसंघातील सक्रिय संपर्क आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केल्याचे नागरिक सांगतात.
संजूभाऊ रायमुलकर हे सलग तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले अनुभवी आणि लोकप्रिय माजी आमदार आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र, सध्या लोकप्रतिनिधी पदावर नसताना सोशल मीडिया बायोमध्ये केवळ ‘आमदार’ असा उल्लेख ठेवणे नागरिकांची दिशाभूल करणारे ठरू शकते, अशी भावना जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे संजूभाऊंनी फेसबुक बायोमध्ये ‘माजी आमदार’ अशी वस्तुस्थितीदर्शक दुरुस्ती करावी, एवढीच नागरिकांची वाढदिवसानिमित्त नम्र-पण स्पष्ट विनंती! संजूभाऊ ती स्वीकारतील, यात शंका नसावी. तूर्तास एवढेच! अन हॅप्पी बिर्थडे संजूभाऊ!











Total Users : 3215213