मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील MDR-45 ते नायगाव देशमुख हा रस्ता गेल्या २१ वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून, सध्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
या मार्गावरून शाळकरी मुले, विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध, रुग्णवाहिका आणि हजारो नागरिक दररोज जीव मुठीत धरून प्रवास करतात. दुचाकीस्वारांचे अपघात, वाहनांचे नुकसान आणि गंभीर रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचविण्यात अडथळे निर्माण होत असतानाही प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनाचे संयोजक गोपाल महादेव सुरडकर आणि रामगोपाल वासुदेव जाधव यांनी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. रस्त्याची पाहणी करून नूतनीकरण व डांबरीकरणाच्या कामाची निश्चित तारीख जाहीर न केल्यास बेमुदत उपोषण, तीव्र जनआंदोलन आणि लोकशाही मार्गाने व्यापक लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.











Total Users : 3212836