खामगाव (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील वारी हनुमान परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या खुंटपुरी येथील तीन तरुणांवर शनिवारी दुर्दैवी प्रसंग ओढवला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना बाहेर काढले; मात्र २० वर्षीय योगेश प्रकाश वानखडे हा अद्याप बेपत्ता असून त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
खुंटपुरी येथील दहा ते बारा तरुण मित्र १ ऑगस्ट रोजी सकाळी सहलीसाठी वारी हनुमान येथे गेले होते. दुपारी योगेश वानखडे, ओम प्रशांत बोचरे आणि आकाश विनोद वानखडे हे तिघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र खोल पाणी आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. आरडाओरड झाल्यानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले.
ओम बोचरे याच्यावर शेगाव, तर आकाश वानखडे याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस, महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक आणि बचाव पथके बेपत्ता योगेशचा शोध घेत आहेत.











Total Users : 3212651