चिखली (हॅलो बुलढाणा) राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्या भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाचे धागेदोरे थेट बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपर्यंत पोहोचले आहेत. विजय चौधरी यांचा तत्कालीन स्वीय सहायक आणि सोशल मीडिया हँडलर राहिलेल्या यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यश टिपरे हा चिखली शहरातील रोहिदास नगर परिसरातील रहिवासी असल्याने या कारवाईने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विजय चौधरी यांचे पुत्र मंदार चौधरी यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत मोबाइलमधील डेटाशी छेडछाड करून कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा आरोप केला होता.
तांत्रिक तपास, डिजिटल पुरावे आणि प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी टिपरेला ताब्यात घेतले. संबंधित क्लिपची प्रत तयार करून ती इतरांपर्यंत पोहोचविल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यामागचा खरा सूत्रधार कोण? क्लिप कुणाकुणापर्यंत पोहोचविण्यात आली? या संपूर्ण डिजिटल साखळीचा नंदुरबार पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.











Total Users : 3212836