जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) शौचास गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा पाय घसरून नदीपात्रात पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, ३१ जुलै रोजी दुपारी जळगाव जामोद येथील मावजीसिद्ध महाराजांच्या गायरान नदीपात्रात घडली. महादेव जगदेव वाघोदे (वय ५५, रा. सिद्धार्थ नगर, जळगाव जामोद) असे मृतकाचे नाव आहे.
महादेव वाघोदे हे दुपारी नदीपात्रात शौचास गेले असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. प्रवाहाच्या वेगासोबत ते वाहत जाऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली.
यावेळी नगरसेवक सय्यद नफीस आणि इरफान भाई यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट नदीपात्रात उडी घेतली. दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून महादेव वाघोदे यांना पाण्याबाहेर काढले; मात्र तोपर्यंत काळाने घाला घातला होता.
घटनेची माहिती शुभम संतोष वाघोदे यांनी पोलिसांना दिली. जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग क्रमांक ५०/२०२६, कलम १९४ बीएनएसनुसार नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ संजय वेरुळकर करीत आहेत. या घटनेने सिद्धार्थ नगर परिसरात शोककळा पसरली आहे.











Total Users : 3208923