लोणार (हॅलो बुलढाणा) तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची अक्षरशः दयनीय अवस्था केली आहे. शाळेच्या आवारासह वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेच्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्याला योग्य निचरा नसल्याने हे संपूर्ण पाणी थेट शाळेच्या परिसरात शिरत आहे. वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही जागा राहिलेली नाही. ओलसर भिंती, घसरडी फरशी आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊन कायमस्वरूपी निचऱ्याची मागणी केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी आणि आश्वासनांचा पाऊस पाडला; प्रत्यक्ष काम मात्र आजपर्यंत झालेले नाही. प्रशासनाच्या या बेफिकीर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने दिला आहे.










Total Users : 2729087