जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकार) ज्ञानदेव राजनकर तालुक्यात गुरुवार, ३० जुलैच्या रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला. नदी-नाल्यांना आलेल्या महापुराचे पाणी गावांतील वस्त्यांसह थेट घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचा संसार पाण्यात गेला. खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, मडाखेड, भेंडवळ, वडशिंगीसह अनेक गावांमध्ये धान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले.
पुराच्या रौद्ररूपाने रस्ते, पूल आणि शेतशिवार जलमय झाले. सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अनेक शेतांतील बांध, सिंचन व्यवस्था आणि शेती साहित्य वाहून गेले असून काही ठिकाणी पशुधन दगावल्याचीही माहिती आहे. वीजवाहिन्या आणि विद्युत खांबांचे नुकसान झाल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, तालुका संकटात असताना तहसीलदार पवन पाटील यांनी कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी रात्री ३ वाजल्यापासून थेट पूरग्रस्त गावांमध्ये धाव घेतली. मुसळधार पाऊस, अंधार आणि धोकादायक परिस्थितीची पर्वा न करता त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना धीर दिला. महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांना तातडीने मदतकार्य व पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांच्या या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी एनडीआरएफ पथक, मंडळ अधिकारी शिंदे, ग्रामसेवक संगीता शेजोळ, तलाठी काळे यांच्यासह स्थानिक कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले व पूरग्रस्त पुलांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.










Total Users : 3241298