spot_img
spot_img

रात्री पाऊस कोसळला अन् सकाळी शेतंच गायब! जळगाव जामोदच्या ‘महाप्रलया’नंतर तुपकरांचा मोठा इशारा!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. अवघ्या एका रात्रीत जळगाव जामोद तालुक्यात तब्बल २५५ मिमी पावसाची नोंद झाल्याने गावागावांत हाहाकार उडाला. नदी-नाल्यांना महापूर आला असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. रस्ते, पूल आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

पुराच्या प्रचंड लोंढ्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके वाहून गेली. काही शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला, तर अनेक ठिकाणी सुपीक मातीच खरडून गेल्याने शेतांचे रूपांतर नदीपात्रात झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून पेरलेली पिके एका रात्रीत नष्ट झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

या भीषण परिस्थितीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. पूरग्रस्तांसाठी तातडीने अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करा, शेती व घरांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करा आणि आठवडाभरात शंभर टक्के नुकसानभरपाई जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली.

“सरकारने केवळ पाहणी दौरे, फोटोसेशन आणि पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेऊ नये. आठवडाभरात प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना पूरग्रस्तांना घेऊन रस्त्यावर उतरेल,” असा आक्रमक इशारा तुपकर यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!