मुंबई/जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विचार विभागाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला नवी धार देण्यात आली असून, जळगाव जामोदचे अजयसिंह राजपूत यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण धुरा सोपविण्यात आली आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन प्रवीण डावर यांच्या हस्ते त्यांना बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कॅप्टन प्रवीण डावर यांचे २२ जुलै रोजी मुंबई विमानतळावर आगमन झाले. २३ जुलै रोजी टिळक भवन येथे खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश काँग्रेस विचार विभागाची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रम, पक्षविस्तार आणि जिल्हानिहाय कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्याबाबत रणनीती आखण्यात आली.
अजयसिंह राजपूत यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जामोदसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस विचार विभागाच्या कामाला नवी ऊर्जा मिळणार आहे. राजपूत यांनी मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळ, हुसेन दलवाई, रामविजय बुरुंगले, प्रकाश पाटील, हाजी मुज्जमील, बाबुभाई दमदार आणि विजय सातव यांचे आभार मानले.











Total Users : 3526348