जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद जळगाव जामोद तालुक्यात उमटले. शहरातील बसस्थानकासमोर भररस्त्यात ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी ११ जणांसह अन्य ५ ते ६ आंदोलकांविरोधात जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२३ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आंदोलकांनी बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर बसून वाहतूक रोखली. यावेळी “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है”, “मोदी मुर्दाबाद” आणि “धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ते २८ जुलैदरम्यान महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले असतानाही आंदोलकांनी विनापरवानगी रस्ता रोको केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी देवानंद दामोदर, सुनील बोदडे, डॉ. संदीप उगले, ॲड. अमर पाचपोर, आजम कुरेशी, सय्यद नफीज, गजानन वाघ, भिमराव ढोण पाटील, नागेश भटकर, तुकाराम काळपांडे, शेख नासीर यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कायंदे करीत आहेत.











