जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात ट्रॅव्हल्स अडकली… काही मिनिटांत पाणी वाढू लागले… जीव वाचवण्यासाठी तब्बल 40 प्रवाशांनी ट्रॅव्हल्सच्या छतावर धाव घेतली… चोहीकडे अथांग पाणी आणि डोळ्यासमोर मृत्यू! अशा थरारक परिस्थितीत केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे यंत्रणा युद्धपातळीवर हलली आणि 40 प्रवाशांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे.
मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील मिठाई व्यावसायिक हितेश दलिचंद पडधरिया (53), मानसी एस. खिलेशिया (28) आणि तीन वर्षीय चिमुकली धिविजा हे गुजरातमधील वापी येथे इंजिनियर असलेल्या जीत पडधरिया याला भेटून नाशिक-जालना ट्रॅव्हल्सने परत येत होते. वापीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील आंबेठी-कोरली परिसरात अचानक पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने ट्रॅव्हल्स पाण्यात अडकली.
पाणी वाढताच प्रवाशांनी ट्रॅव्हल्सच्या छतावर आसरा घेत नातेवाईकांना मदतीसाठी फोन केले. हितेश पडधरिया यांनी जानेफळ येथील राजूभाई पडधरिया यांना माहिती दिली. त्यानंतर डॉ. कृष्णा हावरे, हिम्मतराव आवले आणि जानेफळचे ठाणेदार शरद माळी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनीही वरिष्ठ स्तरावर संपर्क साधला.
घटनेची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांचे स्वीय सहाय्यक राहुल सोळंकी व गोपाल डिके यांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेशी तातडीने समन्वय साधण्यात आला. त्यानंतर गुजरातमधील बचाव यंत्रणा सक्रिय झाली आणि चॉपरच्या मदतीने पुरात अडकलेल्या सर्व 40 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जानेफळच्या तिघांसह सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजताच पडधरिया कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मनापासून आभार मानले.










