spot_img
spot_img

दिल्लीच्या लाठ्यांचे घाव बुलढाण्याच्या काळजावर! विद्यार्थ्यांचे रक्त सांडले, तरुणी मृत्यूशी झुंजतेय; उद्या ‘संवेदनशील बुलढाणेकर’ मुक्याने विचारणार सरकारला जाब!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देशाच्या भवितव्याचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी जखमांचे व्रण आणि डोक्यावर पोलिसांच्या लाठ्यांचे घाव देणारी व्यवस्था नेमकी कोणत्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करते, असा संतप्त सवाल आता देशभरातून उपस्थित होत आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांवर 20 जुलै रोजी पोलिसांनी लाठीमार केल्याने अनेक आंदोलक जखमी झाले. एका तरुणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

आंदोलक संसदेच्या दिशेने निघाल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि पोलिसांकडून लाठीचार्ज तसेच अश्रुधुराचा वापर झाल्याचे राष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या अहवालांत नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी दंडुकेशाहीने उत्तर देण्याची ही पद्धत संतापजनक असल्याची भावना देशभर व्यक्त होत आहे.

या घटनेचे पडसाद आता बुलढाण्यातही उमटले आहेत. ‘संवेदनशील बुलढाणेकर’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ उद्या, गुरुवार 23 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता मूक रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील हुतात्मा स्मारकापासून सुरू होणारी ही रॅली प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

इयत्ता 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आणि पालकांनी पक्ष, जात, धर्म आणि संघटनांचे भेद बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रश्न विचारणारे विद्यार्थी गुन्हेगार आहेत का? त्यांच्या भविष्याची हमी मागणे अपराध आहे का? पेपरफुटीवर उत्तर देण्याऐवजी लाठी हेच सरकारचे उत्तर असेल, तर उद्याची बुलढाण्याची मूक रॅली शांत असेल; पण तिचा सवाल सत्तेच्या कानठळ्या बसवणारा असेल!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!