खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातील डीपी रोडवरील ब्राह्मण सभा समोर सुरू असलेल्या रामा ईलाट प्रोजेक्टवर चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने धाड टाकत तब्बल ₹10 लाख 13 हजार 808 रुपयांचे RR कंपनीचे इलेक्ट्रिक वायर बंडल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
श्री बालाजी इन्फ्रा कंपनीचे योगेश आशिष भगत यांच्या तक्रारीनुसार, प्रोजेक्टसाठी नागपूर येथून आणलेले विविध क्षमतेचे वायर बंडल साइटवरील दुकानात ठेवण्यात आले होते. 21 जुलै रोजी सकाळी सुपरवायझर अक्षय वासकर साइटवर पोहोचले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आणि लाखोंचा माल गायब असल्याचे निदर्शनास आले.
धक्कादायक बाब म्हणजे, मध्यरात्री सुमारे 12.50 वाजता MCB बंद झाल्याने CCTV कॅमेरेही बंद पडल्याचे फुटेज तपासणीत दिसून आले. त्यामुळे चोरट्यांनी आधी निगराणी यंत्रणाच निष्क्रिय करून नंतर शटर फोडत चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या मोठ्या चोरीमुळे खामगावच्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, ₹10 लाखांचा माल नेणारी टोळी नेमकी कोण? इतक्या मोठ्या प्रमाणातील वायर कुठे नेण्यात आली? याचा शोध आता खामगाव शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.










