बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील कराळे ले-आऊट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात वारंवार होणाऱ्या चोरीचा अखेर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, मंदिरातील तांब्याची जलधारा आणि इतर मौल्यवान साहित्य चोरीला गेल्याची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने ठळकपणे प्रसारित करताच पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेत तब्बल 18 हजार 500 रुपयांचा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला.
16 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेदरम्यान सिद्धेश्वर महादेव मंदिरातून तांब्याची जलधारा चोरीला गेल्याचे उघड झाले होते. यापूर्वीही याच मंदिरातून तांबे-पितळी साहित्य, नंदी व मारुती मंदिरातील चांदीचे डोळे, देवीचे चांदीचे नाक, पितळी समई आणि नंदादीप चोरीला गेल्याची तक्रार होती. या प्रकारामुळे ‘देवघरही सुरक्षित नाही का?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत ‘हॅलो बुलढाणा’ने हा गंभीर प्रकार समोर आणला होता.
या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आकाश शिवरतन बाहेती (वय 50, रा. पवार ले-आऊट, सोळंकी हॉस्पिटलच्या मागे, बुलढाणा) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून दोन लहान-मोठ्या तांब्याच्या वस्तू किंमत 6,050 रुपये, पितळी समई 2 हजार रुपये, पितळी नंदादीप 300 रुपये तसेच चांदीचे चार डोळे व नाक किंमत 10 हजार रुपये, असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशाने API सुनील इंगळे, HC दीपक लेकुरवाळे आणि HC एस. के. चांद यांच्या पथकाने ही कारवाई केली.










