बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील कराळे ले-आऊट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिराला चोरट्यांनी वारंवार लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महादेवाच्या पिंडीवर असलेली सुमारे 2 हजार 250 रुपये किमतीची तांब्याची जलधारा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, रामकृष्ण हरिचंद्र राठोड हे 16 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पिंडीवरील जलधारा जागेवर होती. मात्र दुपारी मंदिरातून जलधारा चोरीला गेल्याची माहिती मिळताच त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता ती गायब असल्याचे आढळले.
धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही याच मंदिरातून तांब्याची जलधारा, नंदीचे चांदीचे डोळे, देवीचे चांदीचे नाक, पितळी नंदादीप, समई तसेच मारुती मंदिरातील चांदीचे डोळे असा एकूण 18 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
एकामागून एक देवस्थानातील वस्तू गायब होत असल्याने आता प्रश्न उपस्थित होत आहे चोरट्यांचा पुढचा डाव रोखणार कोण? पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.










