बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवरच आता धमक्या आणि शिवीगाळीचे सावट दाटू लागले आहे. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जाहीरपणे अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होताच राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेने तीव्र निषेध नोंदवत खासदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आज दिनांक 26 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात पत्रकार हा समाजाचा आरसा असून प्रशासन, न्यायव्यवस्था आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे, असे नमूद करण्यात आले. मात्र अलीकडच्या काळात पत्रकारांवर हल्ले, धमक्या, शिवीगाळ आणि दडपशाहीचे प्रकार वाढत असल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खासदारासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांना आई-बहिणींवरून शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि उद्धट वर्तन करणे हे असंविधानिक, बेजबाबदार आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. पत्रकारितेची अस्मिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
खासदार पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास बुलढाणा जिल्ह्यातून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही पत्रकार संघटनांनी दिला आहे.
निवेदनावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम, डिजिटल मीडिया परिषद चे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष गणेश सोळंकी, नितीन शिरसाट,विजय देशमुख,संजय जाधव, विलास खंडेराव, सुरेखाताई सावळे, दीपक मोरे,सुनील मोरे, अजय राजगुरे, प्रशांत सपकाळ, अभिषेक वरपे, अजय काकडे,राहूल चव्हाण,रेहमत अली,शेख असिफ आदी पत्रकार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











