मलकापूर (हॅलो बुलढाणा) शहरात नोकरीच्या नावाखाली तब्बल 11 लाख 03 हजार 540 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर येथे क्लर्क आणि शिपाई पदे रिक्त असून ओळखीतून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत पैसे उकळल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी अरविंद मनोहर किनगे, वय 39, रा. चाळीसविधा, मलकापूर याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सचीन अशोक पाचपोर, वय 34, रा. धरणगाव, ता. मलकापूर यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या मित्रामार्फत अरविंद किनगे याची ओळख झाली. किनगे याने कृषी उत्पन्न बाजार समितीत क्लर्कची तीन पदे रिक्त असल्याचे सांगून, “माझा मोठा परिचय आहे, याआधीही अनेकांना नोकरी लावली आहे,” असा विश्वास दिला. इतकेच नव्हे तर भाजप आमदार चैनसुख संचेती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काजळे यांच्याशी चर्चा झाल्याचे नाव घेऊन प्रत्येकी आठ लाख रुपये लागतील, त्यापैकी प्रत्येकाकडून चार लाख रुपये आधी द्यावे लागतील, असे सांगितल्याचा आरोप तक्रारीत आहे.
यानंतर सचीन पाचपोर, गणेश विष्णू वैतकर आणि वैभव गजानन कात्रे यांनी फोन पे, आरटीजीएस आणि इतर व्यवहारांद्वारे एकूण 11 लाख 98 हजार 040 रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र 20 जानेवारी 2026 पर्यंत नोकरीबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने पैसे परत मागितले असता आरोपीने टाळाटाळ सुरू केली. पुढे धमक्या देत पत्नीच्या नावाने महिला आयोगात तक्रार करीन, सावकारीची खोटी तक्रार करीन, गुंड लोकांकडून काटा काढीन, अशा धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारदाराने केला आहे.
दबाव वाढल्यानंतर आरोपीने काही रक्कम परत दिली. तक्रारीनुसार 94 हजार 500 रुपये परत मिळाले. तसेच 10 लाख, 3.50 लाख आणि 3.50 लाख रुपयांचे चेक देण्यात आले; मात्र सह्या चुकीच्या आणि नाव नसल्याने ते चेक वटले नाहीत. त्यामुळे उर्वरित 11 लाख 03 हजार 540 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानंतर आणि प्राथमिक चौकशीतील कागदपत्रांच्या आधारे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आता या प्रकरणात आरोपीने घेतलेल्या राजकीय नावांचा खरा संबंध आहे की केवळ नोकरीच्या आमिषासाठी मोठ्या नावांचा वापर करण्यात आला, याकडे संपूर्ण मलकापूरचे लक्ष लागले आहे.











