देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २४ जून २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय काढत या रुग्णालयासाठी तब्बल २६ नवीन पदांच्या निर्मितीस मंजुरी दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.
साखरखेर्डा येथे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली होती; मात्र डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी नसल्याने रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होत नव्हते. यामुळे परिसरातील रुग्ण, माता-भगिनी, बालके व ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी दूरवर धाव घ्यावी लागत होती. या गंभीर प्रश्नावर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
शासनाने वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक, कक्षसेवक, सफाईगार, वाहनचालक यांसह २६ पदांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. आरोग्यसेवेसाठी हा निर्णय सिंदखेडराजा मतदारसंघासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.











