spot_img
spot_img

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला पिंप्री आंधळे ग्रामपंचायतीचा जाहीर पाठिंबा; सरकारच्या दुर्लक्षाविरोधात गावकऱ्यांमध्ये संताप! महाराष्ट्रासह जिल्ह्यातील गावागावांतून तुपकरांना वाढता पाठिंबा!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आता गावागावातून पाठिंब्याची लाट उसळू लागली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, हक्काचा पीकविमा मिळावा आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, या मागण्यांसाठी बुलढाणा येथे तुपकर यांचे चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देऊळगाव राजा तालुक्यातील पिंप्री आंधळे ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सरपंच सौ. अंजली अर्जुन आंधळे यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र रविकांत तुपकर यांना सुपूर्द करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्षे रविकांत तुपकर सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असतानाही सरकारकडून त्याच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा तीव्र आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागतो; पण उत्पन्न मात्र अत्यल्प मिळते. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. या आर्थिक तणावातून राज्यभरात शेतकरी आत्महत्यांचे चित्र गंभीर होत आहे. तरीही सरकार झोपेचे सोंग घेत असल्याने जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे.

रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत असतानाही सरकारने अद्याप ठोस दखल घेतलेली नाही. ही शेतकऱ्यांच्या वेदनांची थट्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

गुरुवारी बुलढाणा येथे पिंप्री आंधळे ग्रामपंचायतच्या जाहीर पाठिंब्याचे पत्र सोनू इंगळे, सचिन डोईफोडे, अक्षय परीहार, गोपाल डोईफोडे, योगेश आंधळे, कार्तिक वाघ, शिवानंद डोईफोडे, कारभारी आंधळे यांनी रविकांत तुपकर यांच्याकडे सुपूर्द केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!