मुंबई (हॅलो बुलढाणा) राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सरसकट व विनाअट कर्जमुक्तीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा येथे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा चौथा दिवस संपत आला तरी राज्य सरकारकडून ना कोणती ठोस चर्चा, ना कोणते शिष्टमंडळ, ना कोणताही निर्णय. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत सरकारने घेतलेल्या या असंवेदनशील आणि मुर्दाड भूमिकेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून त्याच संतापाचा उद्रेक आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाहायला मिळाला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी गनिमी काव्याने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसर गाठत सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या जी.आर.विरोधात तीव्र आंदोलन छेडले. सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी काढलेल्या कर्जमाफी आदेशाच्या प्रती आंदोलनकर्त्यांनी फाडून अरबी समुद्रात फेकल्या. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट समुद्रात उड्या घेत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. “शेतकरी जगला पाहिजे”, “फसवी कर्जमाफी रद्द करा”, “सरसकट कर्जमुक्ती लागू करा”, “रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची दखल घ्या”, “शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे सरकार हाय हाय” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त करत सांगितले की, “राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी जगण्यासाठी लढत आहे. मात्र सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. बुलढाणा येथे रविकांत तुपकर चार दिवसांपासून अन्नाचा त्याग करून आंदोलन करत आहेत, तरी सरकारला जाग येत नाही. जर सरकारने आम्हाला जगण्याचा अधिकार नाकारला असेल, तर आम्ही संघर्ष करताना जीवाची पर्वा करणार नाही.”
आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात उतरलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. अनेक कार्यकर्त्यांना ओढत-फरफटत पोलिस वाहनात टाकण्यात आले. काही काळ संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या आंदोलनादरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राज्य समन्वयक सचिन पांडुळे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सांगली संपर्क प्रमुख अजितराव गडदे, सतीश इढोळे, राहुल वानखेडे, कळमनुरी तालुकाध्यक्ष चैतन्य चव्हाण आणि रमेश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर सर्वांना कुलाबा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. लाखो पात्र शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडवून ठेवले आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नापिकीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत सरकार केवळ घोषणा आणि जी.आर. काढून स्वतःची पाठ थोपटत आहे.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची तातडीने दखल घेऊन सरसकट व विनाअट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, नुकसानभरपाई आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही तर राज्यभर संघर्षाची मोठी लाट उभी राहील. गावागावांत आंदोलनाची ठिणगी पडेल आणि शेतकरी रस्त्यावर उतरतील. निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील.











