बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विदर्भातील वाढते तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता बुलढाणा जिल्ह्यातील CBSE तसेच राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आता 30 जून 2026 पासूनच सुरू होणार असल्याचा मोठा आदेश जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभागाने जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांना आणखी दिवसांची वाढ मिळाली असून पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी गटशिक्षणाधिकारी तसेच सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शाळांनी 30 जूनपूर्वी कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांना बोलावू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विदर्भातील तापमान अद्यापही विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अनुकूल नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात नागपूर खंडपीठात दाखल याचिका आणि शिक्षण संचालकांच्या सूचनांचा आधार घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आता जिल्ह्यातील सर्व शाळांनी आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, नियम मोडणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाची नजर राहणार आहे. म्हणजेच पोट्ट्यांनो… बॅग थोडी उशिरा उचला; सुट्टी अजून बाकी आहे












