खामगाव (हॅलो बुलढाणा) पॅरामेडिकल कॉलेजबाबत सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल आणि काही यूट्यूब माध्यमांवर प्रसारित झालेल्या बदनामीकारक बातम्यांवर संस्थेने पत्रकार परिषद घेत जोरदार खुलासा केला आहे. स्किल बहुउद्देशीय संस्था बुलढाणा संचलित खामगाव पॅरामेडिकल कॉलेजला 16 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली असून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांची संलग्नताही असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालय कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहित तत्त्वावर चालते. येथे ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा तीन सेमिस्टरचा अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू नसून, विद्यार्थ्यांच्या फीवरच महाविद्यालयाचा खर्च, कर्मचारी पगार व शैक्षणिक कामकाज चालते.
प्रसारित बातम्यांमध्ये ज्या आदित्य आढाव नावाच्या विद्यार्थ्याचा उल्लेख करण्यात आला, तो यावर्षी परीक्षेलाच बसलेला नव्हता, असा दावा संस्थेने केला. या सत्रात 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला आणि 78 विद्यार्थी परीक्षेला बसले; त्यात आदित्य आढाव नावाचा विद्यार्थी नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले.
संस्थेच्या माहितीनुसार, आदित्य आढाव याने 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रवेश घेतला, 5 हजार रुपये फी भरली आणि डिसेंबर 2024 मध्ये प्रथम सेमिस्टरच्या परीक्षेस बसला. मात्र तो थिअरी परीक्षेला गैरहजर राहिला. त्यानंतर जानेवारी 2025 पासून तो महाविद्यालयात आलेलाच नाही, दुसऱ्या सेमिस्टरला पूर्णतः गैरहजर असून त्याने परीक्षा अर्जही भरलेला नाही, असे संस्थेचे म्हणणे आहे.
संस्थेचा आरोप आहे की, संबंधित विद्यार्थ्याने बनावट कॉल रेकॉर्डिंग, खोट्या सह्या आणि दिशाभूल करणारी माहिती वापरून महाविद्यालयाची बदनामी केली. याप्रकरणी खामगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थी आणि बातमी प्रसारित करणाऱ्या काही चॅनेल्सना मानहानी व नुकसानभरपाईची नोटीस देण्यात आली आहे.
महाविद्यालयाची बाजू न ऐकता बातम्या प्रसारित करणे चुकीचे असल्याचे सांगत संस्थेने पालक व विद्यार्थ्यांना गैरसमज न बाळगण्याचे आवाहन केले आहे.












