लोणार (हॅलो बुलढाणा) बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लोणार तालुक्यातील बिबी येथील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेनिमित्त दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. बुधवारी (दि. १० जून) नदी पार करण्यासाठी भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीतून जात असताना अचानक तोल जाऊन उलटली. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. माहितीनुसार, बोटीत सुमारे ४० ते ५० प्रवासी होते. बोट उलटल्यानंतर सर्व प्रवासी नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मात्र बिबी येथून यात्रेसाठी गेलेल्या कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६५) आणि प्रणिला शेषराव राठोड (वय ६०) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बिबी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अधिकमास यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बोटींची क्षमता, जीवरक्षक साधने आणि प्रशासनाच्या नियोजनाबाबत चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुरुषोत्तमपुरी यात्रा परिसरात शोककळा पसरली असून मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.











