ज.जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील खेर्डा बु. येथील डॉ. कु. कल्याणी गुलाबराव इंगळे हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात मोठा मानाचा तुरा रोवला आहे. दिनांक २८ एप्रिल रोजी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून तिला एम.बी.बी.एस. पदवीसह इ.एन.टी. विषयात सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
नागपूर येथील एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार डॉ. आशिष देशमुख आणि डीन डॉ. सेजल मित्रा यांच्या हस्ते कल्याणीचा सन्मान करण्यात आला. “आरोग्य सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती सेवाभावाने करावी,” असा मोलाचा संदेश राजेश टोपे यांनी दिला.
आई प्रा. डॉ. कल्पना इंगळे आणि वडील पत्रकार गुलाबराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणीने शिक्षणात सातत्य राखत हे यश संपादन केले. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे खेर्डा बु.सह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अभिमानाची लाट उसळली आहे. सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










