spot_img
spot_img

मेहकरमध्ये ‘रिअल लाईफ Drishyam’! ३ वर्षांनी काउंटरखालून बाहेर आला मृतदेह

मेहकर (हॅलो बुलडाणा) थरारपटालाही मागे टाकेल असा वास्तवातील भयानक गुन्हा मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे. सुकळी येथील ३४ वर्षीय विनोद नवले हा तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. मात्र, त्याचा खून करून मृतदेह चक्क जामगाव शिवारातील एका चालू ढाब्याच्या काउंटरखाली पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जाधव (मुख्य आरोपी) आणि विनोद नवले हे मित्र होते. पण पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून सुनीलने खुनाचा कट रचला. जामगाव शिवारातील बाबूभाई कुरेशी यांच्या शेतात सचिन उगले याने ढाबा सुरू केला होता. सचिनने सुनीलकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने, एका व्यक्तीचा काटा काढण्यात मदत कर, कर्ज माफ अशी अट घालण्यात आली.

तीन वर्षांपूर्वी एका रात्री विनोदला ढाब्यावर बोलावण्यात आले. तिथे मद्यप्राशनानंतर त्याची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ढाब्याच्या कॅश काउंटरखाली गाडण्यात आला. विशेष म्हणजे, त्याच ठिकाणी तीन वर्षे व्यवहार सुरू राहिले, पण कोणालाही संशय आला नाही.

२१ एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन केले असता, मृतदेहाचे अवशेष सापडले आणि या ‘रिअल लाईफ दृश्यम’ प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

तीन वर्षांपासून जमिनीखाली दडलेलं सत्य अखेर बाहेर आलं असून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मेहकर तालुका हादरला असून, “सत्य कितीही दडवलं तरी ते बाहेर येतंच” हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!