spot_img
spot_img

मेहकर नगरपरिषद गाळे प्रकल्पात दिरंगाईवर संतापाची लाट; नगराध्यक्षांची थेट कारवाई

मेहकर (हॅलो बुलडाणा) नगरपरिषदेकडून अतिक्रमणधारकांसाठी “ना नफा ना तोटा” तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या गाळ्यांच्या कामात गंभीर दिरंगाई झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प जवळपास वर्षभर उलटूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवल्यानंतर बेरोजगार झालेल्या अनेक दुकानदारांचे व्यवसाय ठप्प झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली. कामातील संथ गती आणि हलगर्जीपणाबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना चांगलेच फैलावर घेतले. जनतेच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम इशारा देत प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पूर्ण झालेले गाळे तातडीने अतिक्रमणधारकांना हस्तांतरित करण्याचे निर्देशही नगराध्यक्षांनी दिले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!